** आजचा तरुण व त्यापुढील
आव्हाने **
‘तारुण्य’
म्हणजे ऊर्जा , तारुण्य म्हणजे इच्छा-अपेक्षा , आशा –आकांक्षा , आनंद-उल्हास ,
नवीन शिकण्याची , नवीन आत्मसात करण्याची उमेद , तारुण्य म्हणजे विचार ...जो
माणसाला नेहमी कार्यप्रवण ठेवतो, उत्साही ठेवतो . ‘तरूण’ आणि ‘तारुण्य’ यात फरक
आहे .
आजचा तरुण ‘तरुण’ तर आहे , मात्र त्यात
तारुण्याचा अभाव दिसून येत आहे. नाविन्याचा , उर्जेचा , विधायक कार्य करण्याच्या इच्छाशक्तीचा , उत्साहाचा अभाव
दिसून येत आहे . आजचा तरुण चंचल तर आहे मात्र स्वाभिमानाऐवजी त्यात गर्व आणि अहंकार
दिसून येत आहे. कर्तुत्व तर शून्य आहे मात्र अहंकार काठोकाठ भरला आहे. आजच्या
तरुणात ऊर्जा तर आहे मात्र त्या उर्जेला दिशा नाही तिचा उचित कार्यासाठी उपयोग होत
नाही त्यामुळे तर सर्व दशा आहे. दुसर्यावर विसंबून राहण्याची , परावलंबित्वाची
मानसिकता आजच्या तरुणात वाढत चालली आहे . उद्यावर व नशिबावर आजचा तरुण विसंबून रहात
आहे . प्रत्येक गोष्टीत आळस आणि आयतेपणा हा वाढत चाललेला आहे . कष्ट करण्याची
तयारी कमी होत चालली आहे. व्यसन तसेच सोशल मिडीयाच्या आधीन गेल्यामुळे मानसिक
अस्वस्थता , अशांतता , आकर्षण , शारीरिक शिथिलता , एकाग्रतेचा अभाव , एका दिवसात
श्रीमंत , प्रसिध्द होण्याची अपेक्षा अशा
एक ना अनेक गोष्टी आजच्या तरुणात वाढत चाललेल्या आहे. आज गरज आहे तरुणांनी जागे
होण्याची . ज्या राष्ट्राचे तरुण झोपेत आहेत त्या राष्ट्राचा सर्वनाश हा आपोआप होत
असतो . त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे. अनावश्यकपेक्षा आपल्यासाठी
काय आवश्यक आहे हे ओळखणे महत्वाचे आहे. जसे आपले ‘इनपुट’ असेल तसेच ‘आउटपुट’
आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे योग्य ‘इनपुट’ देण्याची वेळ आता आली आहे . एक वाक्य
तरुणांनी नेहमी लक्षात असू द्यायला हवं. तुम्ही वर्तमानात काय करता यावर तुमचा
भविष्यकाळ हा अवलंबून आहे . त्यामुळे आपल्याला आपला भविष्यकाळ हा चांगला व्हावा
असे वाटत असल्यास आपण वर्तमानात काय करायला हवे हे सांगण्याची आवश्यकता नाही.
अनेक आव्हाने तुमची वाट बघत आहे आणि
प्रत्येक आव्हानाला आपल्याला मनगटात कधीही न संपणार सामर्थ्य घेवून सामोर जायचं
आहे . संघर्षातून शक्ती मिळवून प्रत्येक आव्हानावर मात करायची आहे . आव्हान मग ते
वैयक्तिक , कौटुंबिक , सामाजिक , जागतिक , मानसिक ...या प्रत्येक आव्हानावर
आपल्याला विजय मिळवायचा आहे . त्यासाठी आळस सोडावा लागेल ...जागे व्हावे लागेल ...उर्जेने
स्वत:ला भारावून घ्यावं लागेल ....कर्म करावे लागतील ...स्वत:ला झोकून द्यावं
लागेल . किर्तीचे, यशाचे अत्युच्च शिखरे तुमची वाट बघत आहे ...तेव्हा जागे व्हा ..ध्येयाच्या
दिशेने प्रवास सुरु करा ..सातत्य ठेवा .
‘माणूस’ हा सवयीचा गुलाम आहे . सवयच माणसाला घडवत –बिघडवत
असते . त्यामुळे चांगल्या सवयी आपल्या अंगवळणी पडायला हव्यात ...सकाळी लवकर उठणे ,
व्यायाम , योगासने , सुर्यनमस्कार हे सर्व व्यायाम शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि ध्यान
, योग या गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी करायला पाहिजेत जेणेकरून भौतिक गोष्टींचा
आपल्यावर प्रभाव पडणार नाही. ...वाईटाचे चिंतन खूप लवकर केले जाते त्यामुळे अशा
गोष्टींपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे ..मनानं सजग राहणे ...मनातला वॉचमन जागृत ठेवणे
...आपले ध्येय सदैव डोळ्यासमोर ठेवणे , त्याप्रती समर्पित असणे या सर्व गोष्टी
महत्वाच्या आहेत.
‘व्यसन’ हे वाईट आहे. तरीही ते केले जाते.
कुठलेही व्यसन करतांना आपल्याला आपल्यासाठी कष्ट करणारे आपल्यावर ज्यांचा विश्वास
आहे असे आपले आई-वडील आठवायला हवे , आपल्यासाठी स्वप्न बघणारे ..आपल्या आई-वडिलांचे
डोळे आपल्याला आठवायला हवे. व्यसन करण्यामागेही शास्रीय कारण असते...त्यात क्षणिक
आनंद मिळतो म्हणून ...मग अतीव , उत्कट, ....कधीही न संपणारे आनंदाचे अनेक स्रोत आहे . तिकडे मनाला
वळवायला हवे. अनेक छंद , खेळ , निसर्ग ,
प्रवास, वाचन , लेखन , गायन अनेक गोष्टी आहेत ...त्याकडे मनाला घेवून जायला
हवं.
‘अति तिथे माती’ ही म्हण नेहमी लक्षात असू
द्यायला हवी. त्यामुळे सोशलमिडीयाचा अतिरेक आपण स्वत:हुनच टाळला पाहिजे . प्रत्येक
गोष्टीचा समतोल साधता यायला हवा. ‘आउटपुट’ काय मिळतंय याला महत्त्व आहे त्यावरून ‘इनपुट’
किती द्यायचं हे ठरवायचं असत. रममाण होण्यासाठी अनेक विश्व आहेत . त्यामुळे फक्त
कृत्रिम , काल्पनिक , आभासी विश्वातच का रममाण व्हायचं ? हा पण एक प्रश्न आहे.
आयुष्य जगत असतांना ताणतणावाकडेही लक्ष देणं
व त्याचे नियोजन करणे हे महत्वाचे आहे. ताणले तर तुटते हे आपण जाणतोच त्यामुळे
प्रत्येक गोष्टीत लवचिकता असायला हवी. फक्त स्वार्थाकडे न बघता नातेसंबंध
जोपासायला हवीत , माणसं जपायला , कमवायला हवीत. फक्त स्वार्थाकडे न बघता काही कामे
निस्वार्थ , उदात्त भावनेनीही करायला
हवीत. आपल्या कौटुंबिक सामाजिक जबाबदारीचं भान ठेवायला हवं. राष्ट्रहित ,
राष्ट्रीयत्व याविषयी आपल्या भूमिका आपण वठवायला हव्यात .
उज्वल भविष्यकाळ हा आपली वाट बघत आहे त्यासाठी
वर्तमानात चांगले कार्य करा, सकारात्मक रहा, स्वत:वर विश्वास असुद्या व
प्रामाणिकपणे आपले ध्येय गाठा. उज्वल भविष्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा.
तुमचाच.
मयूर पन्हाळे.
mayurpanhale.blogspot.com
©मयूर पन्हाळे
*लेख आवडला तर नक्की शेअर करा आणि ब्लॉगला भेट देवून लाईक व फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.