**निळ्याशार आभाळाला**
निळ्याशार आभाळाला प्रश्न विचारण्यासाठी
आज मन आभाळाकडे बघत आहे...
अनंत गुपिते , असंख्य छटांचे हे आभाळ
आज मनाला खूप काही सांगत आहे.
जसे मनात असंख्य विचार असतात...
तशाच आभाळाच्याही आहेत असंख्य भावछटा.
मनातली प्रत्येक भावना काहीतरी
सांगून जाते...
तसेच आकाशातली प्रत्येक छटाही काहीतरी
सांगत असते.
स्वरूप तिचे असाधारण आहे...
ना आदि ना अंत आहे.
जसे अस्तित्व आहे...चिरंतन , तेजस्वी
आत्म्याचे.
प्रश्न आज पडला आहे अस्तित्वाचा ...
अनंत असे ब्रह्मांड हे...
आपलं अस्तित्व नेमकं काय?
चार घटकांचे आयुष्य हे...
असेच निघून जाणार असेल...तर
थोडे थांबावे म्हणतो...
स्वतःशी विचार करावा म्हणतो.
थोडेसे जगून बघावे म्हणतो...
थोडे स्वतःसाठी , थोडे कुटुंबासाठी ,
थोडे समाजासाठी , थोडे राष्ट्रासाठी ..
आणि थोडे जगून बघावे म्हणतो...
काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.
आयुष्य जरी एकच असले...
तरी पैलू मात्र अनेक आहेत.
प्रत्येक पैलूत आयुष्य आहे.
प्रत्येक पैलूत चैतन्य आहे.
समज थोडासा सर्वांना मिळावा...
याचीच मन वाट बघत आहे.
निळ्याशार आभाळाला प्रश्न विचारण्यासाठी ...
आज मन आतुर झाले आहे.
अनंत गुपिते , असंख्य छटांचे हे आभाळ ...
आज मनाला खूप काही सांगत आहे.
mayurpanhale.blogspot.com
No comments:
Post a Comment