वर्गात
तास चालू असतांना अभ्यासाचा विषय निघाला तेव्हा एका
विद्यार्थ्याने विचारले....
......सर
अभ्यास कसा करावा...त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची घाई न करता त्यावर सविस्तर
विचार केला आणि नोट्स तयार केल्या. तेव्हा
मला पण नवीन माहिती मिळाली आणि विद्यार्थी पण आनंदी झाले व त्यांना हवी ती माहिती
मिळाली.
*** अभ्यास कसा करावा. ***
अभ्यास कसा करावा याआधीचा महत्वाचा प्रश्न म्हणजे ‘अभ्यास का करायचा?’ अभ्यास कशासाठी
करायचा ? जसे आयुष्यात आपल्याला कुठे जायचे ,काय करायचे आहे हे स्पष्ट असायला हवे
तसेच अभ्यास का करायचा याचा उद्देशही स्पष्ट असायला हवा. आपल्याला कोणत्या गावाला जायचे आणि कशासाठी जायचे आहे हे माहीत
असल्यावर प्रवास सुखकर होतो. तसेच अभ्यास करण्या पाठीमागचा उद्देश आपल्या मनात
स्पष्ट असायला हवा.
अभ्यास का करायचा ? कशासाठी करायचा याच
उत्तर खुप सोपे आहे. आज तुम्ही कदाचित १५ वर्षाचे झाला असाल .तर एक सोपे गणित करून
बघू. १५ × ३६५×२४ =१,३१,४०० ×६०= ७८,८४,०००
(अठ्ठ्यात्तर लाख चौरयांशी हजार) मिनिटांपासून आपल्यासाठी अविरत कष्ट
घेणाऱ्या ,आपल्या प्रत्येक मागणीची पूर्ती करणाऱ्या ,प्रसंगी स्वत:ला काहीही न घेता आपली
गरज पूर्ण करणाऱ्या आपल्या ,आपल्या आनंदासाठी सतत झटणाऱ्या ,आयुष्यातल्या प्रत्येक
क्षणी फक्त आपल्यासाठीच विचार करणाऱ्या ,ईश्वराकडे नेहमी आपल्या भल्यासाठीच
प्रार्थना करणाऱ्या,आणि या सर्वांच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवणाऱ्या ,काहीही
न मागणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी ,त्यांच्या
कष्टांच ऋण फेडण्यासाठी ,त्यांच्या आयुष्यातही सुखाच्या,समाधानाच्या,आनंदाच्या
लहरी घेऊन येण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते आपलं कर्तव्यच आहे.
एक व्यक्ती म्हणून आपण स्वत:ला कुठे
बघतो? तर एक व्यक्ती म्हणून व्यक्त होण्यासाठी आपल्यातल्या अनेक शक्यता व्यक्त
होण्यासाठी किंबहुना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे.
हे विश्वची माझे घर असा संदेश या
भारतभूमीतील महान संत सांगून गेले आहेत. तर या आपल्या समाजाप्रतीही आपल्या अनेक
जबाबदाऱ्या आहेत . त्या जबाबदाऱ्यावंर खरे उतरण्यासाठी ,आपल्या राष्ट्रासाठी अनेक
विधायक,चांगले कार्य आपल्या हातून घडण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे.
*अभ्यास
म्हणजे नेमकं तरी काय?
तुकाराम
महाराजांनी सांगितले आहे ...
“असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका
म्हणे.”
एखादी
अशक्य गोष्टही सहज शक्य करण्यासाठी जी गोष्ट करावी लागते ती म्हणजे अभ्यास.
आज मुलांनी अभ्यास हा शब्द जरी ऐकला तरी
त्यांच्यावर दडपण येते. मुळात अभ्यासाला बर्डन ,किंवा मनाविरुद्ध काम समजणच चुकीचा समज
आहे.आपण काही उदाहरण बघितले तर आपल्याला लक्षात येईल जसे सचिन तेंडूलकर हा रोज
१०-१५ तास बॅटींगचा सराव करायचा तो त्याचा अभ्यासच होता . सुप्रसिद्ध गायिका लता
मंगेशकर या दररोज तासनतास रियाज करायच्या तो पण त्यांच्यासाठी अभ्यासच होता. ऑलिंपिकमध्ये
२३ सुवर्णपदक मिळवणारा मायकल फेलप्स
सेकंदाच्या काही भागाने आपला परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी रोज तासनतास सराव करायचा तोही त्याचा अभ्यासच
होता.असे विश्वात अनेक उदाहरणे आहेत . हे सर्व व्यक्ती अभ्यास करू शकले कारण त्यांनी अभ्यासाला कधी
अभ्यास समजलेच नाही .... त्यांच्या कामाला त्यांनी व्रत मानले होते.....व प्रत्येक
क्षणात काहीतरी चांगले करण्याची ....आपल्यातला बेस्ट देण्याची जाणीव सदैव त्यांच्या
मनात तेवत होती. त्यांचे ध्येय ठरलेले होते . हे सर्व करतांना ते मनापासुन तिथे
होते. त्यांना आयुष्यात हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी ते समर्पित होते.
अभ्यास का करायचा ? याचे उत्तर त्यांना मिळालेले होते. आपणही यावर विचार
करायला हवा व त्या प्रश्नाच उत्तर स्वत:साठी मिळवायला हवं.
*अभ्यास
कसा करावा*
अभ्यास कसा करावा यासाठी काही साधे नियम आहेत
ते सर्व आपल्याला माहीत आहे. ते जर आपण व्यवस्थित आचरणात आणले तर आपण नक्कीच
यशस्वी होवू.
१)अनुशासन- अनुशासन म्हणजे आपले स्वत:वर
असलेले शासन .एखादी गोष्ट ठरवली असेल तर तिची कार्यवाही त्याचवेळेस व्हायला हवी
करू नंतर, अजून खुप वेळ आहे , उद्या करू असे स्वत:शी म्हणून काहीही उपयोग नाही. एक गोष्ट
नेहमी लक्षात असू द्यावी ....वेळ कुणासाठीही थांबत नसते आणि उद्या कधीच येत नसतो.....उद्या
ही मात्र कल्पना आहे ..म्हणून जे काही करायचे ते आजच आणि आत्ताच .
२)नियमितपणा – कधीकधी आपण एखादी व्यक्ती ,पुस्तक
यांची प्रेरणा घेवून अभ्यासाची खुप जोमाने सुरुवात करतो पण काही दिवसातच ती
प्रेरणा कमी होते व अभ्यासात खंड पडतो ....तसे होवू न देता काहीही झालं तरी मला
एवढ्या तास अभ्यास करायचाच आहे ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे.
*अभ्यासात नियमितपणा आणण्यासाठी अभ्यासाचे
वेळापत्रक बनवावे व आपले ध्येय नेहमी आपल्या डोळ्यांच्या समोर असू द्यावे ....ते
तुम्हांला नियमितपणा आणण्यास मदत करेल.
३)व्यापक स्वरूप- आपण अभ्यास तर सूरू करतो पण
काही वेळेस आपण फक्त वर-वरच वाचतो. आपण तो कनसेप्ट नीट समजून घेत नाही . त्यासाठी
वाचतांना बारकाईने ,लक्ष देवून व भरीव वाचन करावे....
*महत्वाचे
मुद्दे अधोरेखित करावे
*आपल्या
स्वत:च्या नोटस तयार कराव्या जेणेकरून त्या समजण्यास सोप्या जातील.
अशा प्रकारे अभ्यास हा भरीव असावा, तसेच काही
मुद्दे समजले नाही तर त्यासाठी रेफरन्स बुकचा उपयोग करावा ,एकापेक्षा जास्त
पुस्तकांचा वापर , ग्रुप स्टडी ,चर्चा , प्रश्नावली तयार करणे याद्वारे आपण
अभ्यासाचे स्वरूप व्यापक बनवू शकतो जेणेकरून प्रश्न कुठलाही येवो....आपले उत्तर
तयार असेल.
४)एकाग्रता- कुठलेही कार्य करायचे असेल तर
एकाग्रता हि असायला हवी. आवडता चित्रपट बघतांना नकळत वेळ कसा निघून जातो हे आपल्या
लक्षातही येत नाही . अगदी त्याचप्रमाणे अभ्यास करतांनाही मन एवढे एकाग्र व्हायला
हवे की वेळ किती आणि कसा निघून गेला याच आपल्यालाच आश्चर्य वाटायला हवं.
मन एकाग्र करण्यासाठी सकाळी नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार
घालणे , ध्यान, योगासने अशाप्रकारच्या कृती आपण करू शकतो.
५)सकारात्मक दृष्टीकोन- एखादा मुद्दा अवघड
असेल तर मनात मी हे करीलच,मला हे जमणार आहे अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन आपण
ठेवायला हवा...जसे आपले विचार असतात तसेच आपण बनत असतो त्यामुळे आपले विचार नेहमी
सकारात्मक असावे.
६)इच्छाशक्ती-
जगात जेवढे काही कार्य झाली आहेत ,होत आहेत ही सर्व माणसाच्या इच्छाशक्तीचाच
परिणाम आहे. मला खुप करायचा आहे हि इच्छाशक्ती मनात सदैव जागृत असू द्यावी.
७)Step By Step- अभ्यास
करतांना सुरुवातीला थोडा-थोडा करून मगच आपली Capacity
वाढवावी. एकदा Capacity वाढल्यानंतर
आपण त्यात सातत्य आणू शकतो.
८)स्वत:ची
Strategy बनवावी- अभ्यास करण्याच आपलं स्वत:च अस तंत्र बनवावं. जेणेकरून अभ्यास
करण सहज आणि सोपं होईल. जसे की नोट्स काढणे, त्यापूर्वी वाचन,महत्वाचे मुद्दे
अधोरेखित करणे, आढावा घेणे.
मुळातच अभ्यास कसा करायचा यापेक्षा
अभ्यास का करायचा आहे हे आपल्याला माहीत असेल आणि त्याची जाणीव आपल्या मनात कायम
असेल तर तुम्हांला कुणीही थांबवू शकत नाही....आपलं योग्य आणि उच्च ध्येय बनवा , ते
सदैव आपल्या डोळ्यासमोर असुद्या ....खुप चांगला अभ्यास करा...स्वत:च्या उज्ज्वल
भवितव्यावर विश्वास असुद्या.... आणि त्यासाठी वर्तमानातला प्रत्येक क्षण चांगल्या
कार्यासाठीच खर्च करा...आई तुळजाभवानी आपल्याला ज्वलंत असे सामर्थ्य आपल्या हृदयात
निर्माण करो...येणाऱ्या काळात उदंड अशी किर्ती आपणांस लाभो अशी परमेश्वर चरणी
प्रार्थना करतो आणि थांबतो.... तुमचाच.
.......जय हिंद
मयूर पन्हाळे -९९७०९४८४७५
न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार